उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून मी लोकसभा लढलो नाही असं सांगत मी लोकसभेचा उमेदवार असतो तरीही आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही त्यांचा दोन लाख मतांनी विजय नक्की आहे असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. अमित शहा यांच्या आज कराड येथे झालेल्या सभेनंतर पृथ्वीराज चव्हाणांनीसुद्धा पत्रकारांशी संवाद साधला.

अमित शहा दुय्यम फलंदाज आहेत. आज खरं तर नरेंद्र मोदी कराडला येणार होते पण निवडणुकीचा एकूण अंदाज घेऊन त्यांनी दुय्यम फलंदाज इकडे पाठवला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेला आलेल्या अमित शहांवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर न बोलता ३७० कलमावर बोलणाऱ्या अमित शहांनी काश्मिरबाबत अभ्यास करावा असा सल्लाही शहांना त्यांनी दिला. पंडित नेहरू होते म्हणून आज काश्मीर भारतात असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. एकूणच कराडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जुगलबंदी रंगल्याचं आज पहायला मिळालं.