हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेल्या या पदयात्रेतील दिल्ली हे दहावे राज्य असून आज या यात्रेचा १०८ वा दिवस आहे. आज संध्याकाळी साडेचार वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर जाईल आणि तिथेच राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी मोठ्या संख्येने पादचारी आणि वाहने सहभागी होण्याची शक्यता आहे. भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनीही लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण करून विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल. तिथे राहुल गांधी यांची तोफ धडाडणार आहे. दिल्ली काँग्रेसनं भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.
दिलवालों की दिल्ली,
खुली बाहों से यात्रा का स्वागत कर रही,
आगे बढ़ रही, साथ चल रही!आज भारत जोड़ो यात्रा में, हरियाणा कांग्रेस अध्यक्ष उदयभान जी, दिल्ली कांग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी जी को राष्ट्रीय ध्वज सौंपते हुए।#BharatJodoYatra pic.twitter.com/LTy79rIy3u
— Bharat Jodo Nyay Yatra (@bharatjodo) December 24, 2022
दरम्यान, कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा मधून दिल्लीत आली आहे. भारत जोडो यात्रा हि ऐतिहासिक पदयात्रा मानली जातेय. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी थेट लोकांमध्ये मिसळून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत तसेच जनतेचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेत आतापर्यंत देशातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, कॉमेडियन कुणाल कामरा, बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, रिया सेन आणि पूजा भट्ट, आंतरराष्ट्रीय बॉक्सर ऑलिम्पिक विजेता विजेंदर सिंग यांचा समावेश आहे.