हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) प्रथमच थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे या वादानंतर काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट नेमकी कधी होईल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच भेट असेल. राहुल गांधी यांच्या रूपाने प्रथमच गांधी घराण्यातील व्यक्ती मातोश्रीवर येणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशाचे लक्ष्य असेल. या भेटीत भाजपविरोधी मोट, सावरकर मुद्दा, अदानी प्रकरण यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपविरोधी सर्व पक्षांनी कंबर कसली-
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील भाजप विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. त्यांनतर काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि राहुल गांधी यांच्यात बैठक पार पडली. विरोधी पक्षांचे ऐक्य हा या भेटीं मागचा मुख्य हेतू होता. आता राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. असं झाल्यास विरोधकांच्या एकीला अजून बळ मिळेल आणि मातोश्रीचे राजकीय वजनही अधोरेखित होईल.