मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात येऊ लागला आहे. देशपातळीवरील नेते आता राज्यात दाखल झाले आहेत. लातूरमधील औसा या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी लातूर व उस्मानाबदमधील उमेदवारांसाठी रविवारी प्रचार सभा घेतली. मोदी सरकारच्या धोरणांवर आणि कार्यक्षमतेवर ताशेरे ओढत त्यांनी आपल्या भाषणात जोर दिला.

देशातील,किंबहुना आज महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाला विचारलं की, इथली मूळ समस्या काय आहे? तर शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी ही दोनच उत्तरे आपल्याला ऐकायला मिळतात. माध्यमांत मात्र या गोष्टी कुठेच दाखवल्या जात नाहीत. देशभरातील शेतकरी मोदींनी आमची वाट लावली म्हणत असताना, माध्यमात हे कुठेच का दाखवलं जात नाही? मोदीसुद्धा या प्रश्नांवर कुठेच काहीही बोलत नाहीत. ते बोलताना तुम्हाला चंद्र, चीन, पाकिस्तान हेच मुद्दे दिसतील. आपल्या हातात असणारी माध्यमं वापरून जनतेला भूलवण्याचं ह काम सुरू आहे. हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? असा संतप्त सवाल राहुल गांधींनी केला.

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले. देशातील जनतेला विभागण्याचं काम मोदी करत असून हे भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीला घातक आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात काँग्रेसचीच विचारधारा असून इथली जनता निवडणुकीत नक्की बदल दाखवेल असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.