विशेष गाड्यांच्या तिकीट बुकिंगबाबतचा रेल्वेने बदलला ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर तिकीट काऊंटर उघडणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते पण सोमवारी रात्री हा निर्णय बदलण्यात आला आहे. काही ठराविक स्थानकांवर ठराविक वर्गासाठी तिकिट काऊंटर सुरु राहणार आहेत. ज्या ठिकाणाहून ट्रेन सुटतील आणि ज्या ठिकाणी पोहोचतील अशा ठिकाणी तिकिट काऊंटर खुली राहणार आहेत.

जनरल प्रवासी या ठिकाणाहून तिकिट घेऊ शकणार नाही. विशेष वर्गासाठी तिकिट काऊंटर खुले राहील असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष रेल्वे मार्गावर खासदार, स्वातंत्र्य सैनिक यांना ही सुविधा असल्याचे रेल्वेने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले आहे. जनरल वर्गाच्या तिकिट या वेबसाईटद्वारेच मिळणार आहेत. दिव्यांग वर्गासाठी ३एसीमध्ये दोन जागा आरक्षित असतील. सध्याच्या आणि माजी खासदारांसाठी १ एसीमध्ये दोन जागा, २ एसीमध्ये चार जागा आरक्षित असतील. रुग्ण, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती तिकिटमध्ये सवलत घेऊ शकतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती सवलत नसेल. सोमवारी ११ मे रोजी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. त्यानुसार, केवळ तीन तासांत ५४,००० प्रवाशांपैकी ३०,००० तिकिटं बुक झाली. विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे.

रेल्वे प्रवासाठी देण्यात आलेल्या काही अटींमध्येच कन्फर्म ई तिकीट असणं अनिवार्य असेल. त्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय प्रवासाची सुरुवात करतेवेळी आणि प्रवासादरम्यानही सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन गेलं जाण्याची अट नमूद करण्यात आली आहे. निर्धारित स्थानकावर पोहोचल्यानंतर तेथे आरोग्य विभागाच्या आदेशांनुसार सर्व अटीचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल. रेल्वेची कँटीन सेवा बंद असेल. शिवाय नेहमी देण्यात येणाऱ्या सुविधा उदा. ब्लँकेट, चादर, उशी या सुविधा पुरवण्यात येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळं सर्व प्रवाशी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ५० दिवसांनंतर आता या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.  खास रेल्वे सेवांअंतर्गत या विशेष रेल्वे गाड्या रुळांवर धावणार आहेत. नवी दिल्लीला जोडणाऱ्या दिब्रूगढ, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदाबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवअनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू ताबी अशा स्थानकांवरुन या रेल्वे सोडण्यात येतील.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment