…. म्हणून शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत; राज ठाकरेंचा थेट आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाले असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुस्लिम मते जातील म्हणून शरद पवार कधी शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असेही ते म्हणाले. सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, शरद पवार नेहमी आपल्या भाषणात शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घेतात पण त्यांनी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेतलं नाही. त्यांची जुनी भाषणं काढून पहा ते शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत कारण महाराजांचे नाव घेतलं कि मुस्लिम मते जातील. मी एका मुलाखतीत त्यांना याबाबत विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना शाहू, फुले, आंबेडकर हा विचार आहे, असं ते म्हणाले होते. मग शिवाजी महाराज हा विचार नाही का? त्या विचारावरच पुढचा विचार आला ना? असा सवालही राज ठाकरेंनी केला.

दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या या आरोपांना राष्ट्रवादी काय प्रत्युत्तर देते हे आता पाहावं लागेल.