Wednesday, June 7, 2023

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा असलेला ५ जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली. तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे सांगत पुण्यातील सभेत सविस्तर बोलू, असे ठाकरे यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे.

राज ठाकरे यांनी नुकतेच ट्विट करीत आपल्या अयोध्या दौऱ्याला स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हण्टले. राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या दुखण्याने उचल खाल्ल्याने राज ठाकरे हे अचानकपणे मुंबईला काल गेले आहेत. आता दौऱ्याबाबत अधिकृत घोषणा केल्यामुळे ते पुणे येथे आज येणार आहेत.

एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना हा त्रास जाणवत आहे. मध्यंतरी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी देखील पायाच्या दुखण्यामुळेच त्यांना दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते. या दुखापती संदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचारही घेतले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागला आहे.

 

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनीही कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला होता. यासाठी ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा खडतर मानला जात होता. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याासाठी मनसेने जोरदार तयारी केली होती. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी 10 एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यासंदर्भातही बोलणी सुरु होती. मात्र, आता राज ठाकरे यांनीच प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला आहे.