हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही कोणाशी पण आघाडी केल्याचे आपण बघितलं आहे. नुकतंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप शिंदे गटासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. या राजकीय भूकंपानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे अशी बातमीही पसरत आहे.
आज मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सामना कार्यालयात शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी पानसे यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीनंतर अभिजीत पानसे थेट शिवतीर्थावर गेले आणि दुसरीकडे संजय राऊत सुद्धा उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले आहेत. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. आपण युतीचा प्रस्ताव घेऊन आलेलो नाही तर माझ्या वयक्तिक कामासाठी आलो असं स्पष्टीकरण अभिजीत पानसे यांनी दिले आहे. मात्र अचानक झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून राज्यात अनेक युत्या आणि आघाडी पाहायला मिळाल्या. आधी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यातच भर म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवार आपल्या गटासोबत शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सामील झाले. राज्यात इतक्या मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्यानंतर आता कट्टर विरोधक असलेले ठाकरे बंधूही एकत्र यावेत अशी इच्छा मराठी माणसाची आहे. याबाबतचे पोस्टर्सही ठिकठिकाणी झळकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.