हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा सामना पाहायला मिळत आहे. शिंदे गटही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास उत्सुक असून यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावतील अशा चर्चानी जोर धरला आहे. असं झाल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल.
तब्बल ५६ वर्षांपासून शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे अतूट समीकरण आहे. शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क या मैदानावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली आणि ती पूर्ण देशात गेली .त्यामुळे राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते.
तसेच दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे ठाकरे ब्रँड आहे. ठाकरे आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. ठाकरेंशिवाय दसरा मेळावा पार पडल्यास शिंदे गटाला जनतेच्या रोषाला सामोरे जाऊ लागू शकते. परंतु राज ठाकरे व्यासपीठावर असतील तर दसरा मेळाव्यात ठाकरे घराण्याचा वारसा सांगणाऱ्या व्यक्तीची उणीव जाणवणार नाही. त्यामुळेच राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येऊ शकतात. तशा चर्चा सध्या रंगत आहेत.
यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित केलं होत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर आमंत्रित करू शकतात.