जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण घडले आहे. यामध्ये बाडमेर पोलिसांनी नववधू आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. यामध्ये लग्न जुळवून देणाऱ्या दलालाने वरपक्षाकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर वधूशी खोटे लग्न लावून दिल्याचा आरोप त्या दलालावर करण्यात आला आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट अशी कि ती नवविवाहित वधू आधीच विवाहित होती, आणि ती दोन मुलांची आईही आहे. असा खुलासा त्या नवविवाहित महिलेने केला आहे. लग्न झाल्यावर वधूला पंजाबमधील आपल्या मूळगावी परत नेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी नववधूला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
राजस्थानमातील बाडमेर जिल्ह्यात राहणाऱ्या संबंधित पीडित तरुणाचे लग्न जमत नव्हते. यादरम्यान या व्यक्तीची ओळख जुझाराम याच्याशी झाली. यानंतर जुझारामने पीडित तरुणाला लग्न जुळवून देतो असे आमिष दाखवले. मात्र यासाठी तुला तीन लाख रुपये मोजावे लागतील अशी अट त्याने संबंधित पीडित तरुणाला घातली. यानंतर लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणाने आपल्या भावाशी यासंदर्भात चर्चा केली. यानंतर दोघे भाऊ पैसे देण्यासाठी तयार झाले. यानंतर 27 डिसेंबर रोजी बाडमेर न्यायालयात या तरुणाचे एका महिलेशी लग्न लावण्यात आले.
या नववधूचे नाव कोडाबाई असे असून ती मूळची पंजाबची रहिवासी आहे. लग्नानंतर 10 दिवस या नव्या जोडप्यांमध्ये सर्वकाही सुरळीत चालले होते. यानंतर काही दिवसांनी दलालाने वराच्या घरच्यांना फोन करुन सांगितले कि वधूच्या माहेरी एका नातेवाईकाचे लग्न आहे. त्यामुळे तिला काही दिवसांसाठी पंजाबला पाठवा. मात्र वधू किंवा तिच्या माहेरच्या मंडळींऐवजी दलालाने फोन केल्यामुळे पीडित तरुणाच्या कुटुंबियांना याचा संशय आला. यानंतर वराच्या कुटुंबीयांनी नववधूची खोदून-खोदून चौकशी केली. तेव्हा तिने हा सगळा प्रकार सांगितला. ‘मी आधीच विवाहित आहे, मला दोन मुलं आहेत, मला जाऊ द्या’ असा खुलासा तिने यावेळी केला. यानंतर वराचा भाऊ तिला आणि तिच्या मैत्रिणीला कोतवाली पोलिस ठाण्यात घेऊन गेला. या प्रकरणी तीन दलाल आणि नववधूवर फसवणुकीसह अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला अटक केली आहे. तसेच या दलालांचा शोध घेण्यासाठी काही पथके तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.