हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत.
मात्र, त्याचे पालन होत नसल्याने आज आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज पुन्हा निर्बध अधिक कडक करण्याचा इशारा दिला आहे. “सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात दुप्पट होत आहे. अजूनही नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर निर्बंध अधिक कडक करू,” असे टोपे सांगितले.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात करण्यात आलेल्या लसीकरणातआपण थोडे मागे असून ते योग्य नाही. रुग्ण संख्या कमी करायची असेल तर लसीकरणाची ही टक्केवारी वाढवावी लागणार आहे. त्यासाठी आता आपल्याला राज्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करायचे आहे.
मागील आठ दिवसाचा आढावा घेतल्यास असे समजेल की 20 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाच ते सहा इतक्या संख्येत एक्टिव्ह रुग्ण होते, पण आता महाराष्ट्रात 11 हजार 492 रुग्ण आहेत. मुंबईच्या बाबतीत विचार केल्यास अगोदर मुंबईत 300 च्या आसपास केसेस होत्या, आज1300 वर पोहचलया आहेत. सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. दोन दिवसात दुप्पट होत आहे, अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे.
राज्य सरकारच्यावतीने नागरिकांसाठी खबरदारी म्हणून कोरोनाचे नियम घालून देण्यात आलेले आहेत. जर हेच नियम नागरिक पाळणार नसतील तर राज्यात अजून निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल. वाढत असलेली रुग्णसंख्या, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. टोपे यांनी दिली आहे.