हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साथ सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही, मला मोठी ऑफर आली तरी मी हुरळून जाणार नाही. आपण महाविकास आघाडी सोबत सुद्धा नाही आणि भाजप सोबतही नाही. स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटना स्वबळावर लढेल असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
राजू शेट्टी म्हणाले, माझ्याकडे तरी कोणी संपर्क साधलेला नाही, पण आडमार्गाने किंवा मध्यस्थाने मी दिल्लीत जाऊन केंद्रीय नेत्यांना भेटावं, बोलावं, काही कामानिमित्त त्यांच्याकडे जावं अशा सूचना येत आहेत. त्याही गोष्टीकडे मी दुर्लक्ष्य केलं आहे. अशा ऑफर आल्यावर सुद्धा त्याला हुरळून जाण्याइतपत मी काही लेचापेचा नाही. आता चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याचे मी ठरवल आहे. असं असताना कोणत्याही आघाडीबरोबर जायचं नाही असा माझा निर्णय झाला आहे. त्यामुळे कोणीही ऑफर दिल्या तरी आम्ही विचलित होऊ शकत नाही असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
कोणाच्याही आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. आघाड्यांच्या जाहीरनाम्याशी लोक प्रामाणिकपणे राहत नाहीत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक अशा बातम्या पेरत असतील याची शक्यता आहे. आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठीच काम करणार असे म्हणत राजू शेट्टी यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता राजू शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे नेमकं कोणाला फायदा होतो आणि कोणाचं नुकसान होते ते निवडणुकीनंतरच समजेल.