सांगली प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी सोबत राज ठाकरे यांनी येऊन भाजपला दणका द्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांनी मतविभाजन टाळण्यासाठी वंचितने महाआघाडी सोबत गेले पाहिजे असे मत देखील व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थळी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीच्या दरम्यान राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे सांगणे कठीण आहे. मात्र मनसे इथून पुढे आंदोलनात शेतकरी संघटनेच्या बाजूने उभी राहील असा विश्वास राजू शेट्टी यांनी या वेळी माध्यमात बोलताना व्यक्त केला होता. तसेच राष्ट्रवादी सोबत राज ठाकरे यांनी वाढवलेली सलगी आणि आगामी विधानसभा निवडणुक लढण्याच्या दृष्टीने महत्वाचे समीकरण घेऊन येऊ शकते. तसेच राज ठाकरे यांचा महाआघाडीत समावेश करायचा की नाही करायचा यासाठी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींचा पाठिंबा असणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे राज ठाकरे वंचितकडे जाणार कि महाआघाडीत जाणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.
राज ठाकरे यांना सोबत घेऊन राजू शेट्टी स्वतःची महाघाडीतील ताकद वाढवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना घेऊन राजू शेट्टी स्वतः वंचित बहुजन आघाडीत देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणाची समीकरणे उलट सुलट तयार होण्याची शक्यता आहे.