कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हैराण झाला आहे, त्यांच्या पिकांचे हजारो- कोटींचे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळत नाही, उसाची एफआरपी जवळपास साडेतीन हजार कोटी थकित आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी सानुग्रह अनुदान ५० हजार रूपये दिले जाणार होते, ते अजून सरकारने दिलेले नाही. शेतकऱ्यांनी दोन लाखांपेक्षा जास्त असलेली कर्ज भरल्यास त्यांना कर्जमाफी दिली जाईल, मात्र आज बँका त्यांना कर्जही देत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांचे जे थकित वीजबिल आहे, त्याला मात्र महावितरण कंपनी पठाणी १८ टक्के व्याज लावते, तेव्हा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केल आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना येथे गुरूवार (दि.२५) पासून धरणे धरून बसणार आहे, त्यावेळी ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, आमच्या शेतकऱ्यांचे हक्काचे जे पैसे आहेत, ते वसूल करून द्यायची जबाबदारी सरकारची आहे. कुठेतरी एक- दोन हजार रूपये वीज बिल थकित आहे, तर महावितरण कंपनी धडाधड विज कनेक्शन तोडायच सत्र आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे, तेव्हा अशा परिस्थीतीत आपण गप्प बसायचे का? अशावेळी पायातल हातात घेवून सरकारला जाब विचारला पाहिजे.
राज्याचे सरकारमंत्रीच थकबाकीदार आहेत. त्यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांचे पूर्ण एफआरपी दिलेली नाही. सहकारमंत्रीच थकबाकीदार असेल तर मग अशावेळी राज्यातील साडेतीन हजार कोटी थकित असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. उद्या सहकारमंत्र्यांच्या (दि.२५) सह्याद्री कारखान्यांवर धरणे धरून बसणार आहे.
राज्यातील ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, त्याच्यावर कारवाई करा. त्यांना थकबाकीदार ठरवा आणि ज्या सहकारी कारखान्यांच्या निवडणुका लागतील त्यांना सरकारी थकबाकीदार समजून त्यांचे निवडणुकीत अर्ज अपात्र ठरवा. एफआरपीचे पैसे मिळण्यासाठी मी बसणार आहे, तुम्ही या असे अवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा