हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला नमवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. यानंतर आता राज्यात तिसरी आघाडीही लवकरच पाहायला मिळणार आहे. राज्यातील छोटे छोटे घटक पक्ष एकत्र येऊन ही तिसरी आघाडी स्थापन करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. लवकरच राज्यातील जनतेला महायुती आणि महा विकास आघाडीनंतर तिसऱ्या आघाडीचा पर्याय दिला जाणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. यासंदर्भात लवकरच छोट्या घटक पक्षांची बैठक पार पडणार असून या आघाडीला बीआरएस पक्षाचाही पाठिंबा असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक काळापासून राज्यात वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला 2019 च्या काळात भाजप आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस कडून महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुन्हा 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात शिंदे फडणवीस महायुतीचे सरकार पाहायला मिळाले. आता नुकतीच राष्ट्रवादी पक्षात देखील फूट पडली असून अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या सत्तेत आहेत.
छोट्या पक्षांची कोंडी
राज्यातील या बदलत्या राजकीय परिस्थिति मुळे दुसरीकडे छोटे घटक असणाऱ्या पक्षांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आता राज्यात आणखीन एक तिसरी आघाडी पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी विरोधात आणखीन एक पर्याय उभा राहणार आहे. राज्यात मुख्य पदावर असलेले नेते सतत आपली भूमिका बदलत असल्यामुळे यामध्ये छोट्या पक्षांची कोंडी होताना दिसत आहे. अशावेळी या छोट्या पक्षांनी काय भूमिका घ्यावी हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता या सर्व बाबींचा विचार करून राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
कोल्हापुरात होणार बैठक
कोल्हापुरात तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेविषयी लवकरच बैठक पार पडणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाणी, बहुजन विकास आघाडी. समाजवादी पक्ष, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपल्बिकन सोशलिस्ट पक्ष, भाकपा, माकप असे सर्व पक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतच तिसऱ्या आघाडीचा विचार करण्यात येईल. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थापन करण्यात येणारी ही तिसरी आघाडी आगामी निवडणुकांसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल.