हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी 2024 लोकसभा निवडणुक शिर्डी मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती दिली आहे. रामदास आठवले अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी शिर्डीतून लढायचे आहे पण पडायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत 2009 ला शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल त्यांनी आज पुन्हा बोलून दाखवली.
अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी उत्सुक आहे. यावेळी मी लढणार, पण पडणार नाही. केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून नगर आणि शिर्डी येथे मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यात येतील. त्यामुळे मी निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी तेथून निवडणूक लढेल. भाजप आणि मित्रपक्षाने मला आग्रह केला तर मी नक्कीच शिर्डीतून निवडणूक लढेल, असं रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, सध्या शिर्डी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आहेत. सध्या ते शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले आहेत. राज्यात शिंदे गट- भाजपचे सरकार असताना आठवलेंना शिर्डीतून निवडणूक लढायची असेल तर भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरणार आहे.