रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात मनाई; अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । करोनावर परिणामकारक औषध शोधून काढल्याचा दावा करणाऱ्या रामदेव बाबांच्या पतंजलीला महाविकास आघाडी सरकारनं झटका दिला आहे. अधिकृत मान्यतेशिवाय राज्यात कोरोनील विक्रीला मनाई करण्यात आली असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून सांगितलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाच्या विक्रीवर राज्यात बंदी घातली आहे.

पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असं सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे औषध आणण्यात आले. सुरुवातीला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता ते संपूर्ण करोनावर मात करणारे औषध म्हणून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात या औषधाला कुठल्याही अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळालेली नाही. ती मिळाली असल्यास तसं सिद्ध करावं, अशी मागणी ‘आयएमए’नं केली आहे. ‘हा प्रकार सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. करोनाची लस येण्यासाठी इतके महिने लागले असताना हे औषध इतक्या लवकर कसं उपलब्ध झालं? त्याला कुणी मान्यता दिली, असा प्रश्नही ‘आयएमए’नं केला आहे.

पंतांजलीच्या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर थेट WHO नेच आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like