कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे सुरु आहे. याविरोधात राष्ट्रीय काँग्रेस देशपातळीवर हात जोडो अभिमान राबवणार असून यातून पंतप्रधान मोदी व गौतम अदानी यांची मिलीभगत सर्व देशबांधवांना सांगण्यासाठी संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही अशी सुरुवात आजपासून करण्यात आली असल्याने सातारा जिल्हा काँग्रेस यासाठी सक्रिय झाली असल्याची अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सदस्य रणजीतसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय काँग्रेसचे माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने यांच्या निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. यावेळी खटाव काँग्रेसचे नेते डॉ. महेश गुरव, अल्पसंख्याक विभागाचे गब्बारभाई काझी, शिवाजीराव यादव, निवेश घार्गे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेला सामान्य जनतेने दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हडबडलेल्या केंद्र सरकारने राहुल गांधी यांचा जुना व्हिडीओ काढुन त्यांची खासदारकी रद्द केली आहे. यावर सभागृहात आवाज उठवणाऱ्या काँग्रेस व विरोधी पक्षांच्या खासदारांचा व आमदारांचा भाजपकडून आवाज दाबला जात आहे.
देशात एकप्रकारे हुकुमशाही सुरु असुन त्याचा जो कोणी विरोध करेल त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवले जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडुन सुरु असलेल्या या दडपशाही विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडुन संपूर्ण भारत भर हात जोडो अभिमान राबवले जाणार आहे. या अभियानातून ग्रामीण जनतेला केंद्राची व राज्याची सुरु असलेली दडपशाही, महागाई याविषयी कॉंग्रेसची भूमिका समजावून सांगितली जाणार आहे.