Wednesday, October 5, 2022

Buy now

पाणी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला मारहाण करत बलात्कार : साताऱ्यात युवकाला अटक

सातारा | पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. रसिक अनिल धोत्रे (वय- 20, रा. इंदिरानगर, झोपडपट्टी सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित 16 वर्षांची मुलगी दि. 21 मे रोजी घरात एकटी होती. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास रसिक धोत्रे हा पीडित मुलीच्या घरी गेला. घराच्या बाहेर येऊन त्याने मला पाणी दे, असे सांगितले. त्यावेळी पीडित मुलगी घरात पाणी आणण्यासाठी गेली असता रसिकने अचानक घरात येऊन दरवाजाची कडी आतून लावली. त्यानंतर मुलीला मारहाण करत बलात्कार केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

या प्रकारामुळे संबंधित पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने हा प्रकार घरातल्या कोणालाही सांगितला नाही. परंतु पुन्हा असा प्रकार कोणाबाबतीत घडेल, असे मुलीला वाटू लागल्याने तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 6 जून रोजी रात्री बारा वाजता रसिक धोत्रेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला तातडीने अटकही करण्यात आली.