नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. जरी टीम इंडिया हि फायनल हारली असली तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने मात्र या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेऊन हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
आर.अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 71 विकेट घेत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने हा विक्रम करताना पॅट कमिन्स आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना मागे टाकले आहे. पॅट कमिन्सच्या नावावर या स्पर्धेत 70 विकेट तर ब्रॉडच्या नावावर 69 विकेट होत्या.अश्विनने फक्त 26 इनिंगमध्येच 71 विकेट आपल्या नावावर केल्या, तर कमिन्सला 70 विकेट घ्यायला 28 इनिंग खेळाव्या लागल्या.
अश्विनने या फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टॉम लेथम आणि डेवॉन कॉनवे यांना आऊट करत हा विक्रम आपल्या नावावर केला. लेथमने अश्विनच्या बॉलिंगवर पुढे येऊन शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण यात तो फसला आणि ऋषभ पंतने त्याला स्टम्पिंग आऊट केले. लेथमची विकेट घेतल्यानंतर अश्विनने डेवॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले.