आमदार निधीत कपात करा, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आमदारांचा विकासनिधी 2 कोटीने कमी करावा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्यावे. कठोर निर्बंध आणि जगणं यात समन्वय साधला गेला पाहिजे. त्यासाठी आमदारांचा निधी कमी करावा व कामगारांना न्याय द्यावा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. “लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. यात महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथे ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे.

बैठकीपूर्वी सुरवातीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी माहिती दिली.त्यानंतर ठाकरे म्हणाले, लोकांचे येणे जाणे कमी करणे हा विषय आहे. कार्यालयाच्या वेळा बदला. घरी काम करण्याची परवानगी द्या पण अजून ते झालेलं नाही. व्हॅक्सिनचा दुसरा डोस देऊन पण लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानसमोर मांडला होता. चेन तोडणे आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे आहे. कालच निर्णय झाला असता पण काल देवेंद्र फडणवीस नव्हते म्हणून आजचीही बैठक बोलावली आहे. एक मुखाने निर्णय घेण्याची गरज आहे. महिन्याभराच्या आता आपण नियंत्रण आणू शकतो. पण एकमत व्हायला हवं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोनाचे रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील ही उपाययोजना हवी. खाजगी स्तरावर रेमडेसीवर कुठेही नाही ही गंभीर बाब आहे. लसीचा पुरवठा होईल याची व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील. राज्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी लागेल. इतर ठिकाणाहून कसं ऑक्सिजन मिळालं पाहिजे, इंडस्ट्रीचं ऑक्सिजन कमी करावा लागेल. बेड्स मॅनेज करावे लागतील. हा प्रादुर्भाव किती दिवस राहील हे सांगता येत नाही त्यामुळे व्यवस्था तात्काळ उभ्या कराव्या लागतील.

You might also like