क्रेन खाली चिरडून सेवानिवृत्त सैनिकाचा जागीच मृत्यू; सायकलसह 20 मीटर फरफटत नेले

अमरावती : सायकलींगसाठी निघालेल्या सेवानिवृत्त सैनिकाचा क्रेनच्या खाली दबून जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना एमआयडीसी बायपास मार्गावर रविवारी घडली. दुर्योधनबोरकर, वय ६७, राहणार गणपतीनगर असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपती नगर येथील रहिवासी दुर्योधन बोरकर रोजच्याप्रमाणे सायकलींग करिता निघाले होते. घरापासून काही अंतरावर दूर बायपास मार्गावर मिरची हॉटेल जवळ येताच एमआयडीसी वरुन दस्तूर नगरच्या दिशेने जाणारी क्रेन ( क्रमांक एमएच -२७ एसी – ९६१६ ) च्या खाली आले. हा अपघात एवढा भीषण होता की, सुमारे २० मीटरपर्यत क्रेन बोरकर यांना घासत घेवून गेली. या अपघातात क्रेनच्या खाली चिरडून बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, अमरावती शहरातील राजापेठ पोलिस त्वरीत तेथे पोहचले आणि क्रेन चालकाला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. क्रेनचालकाविरुध्द राजापेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजापेठ पोलिस स्टेशन करीत आहे.