या फलंदाजाला मानले जात होते सेहवागचा उत्तराधिकारी, मात्र ‘या’ छोट्याशा चुकीमुळे खराब झाली कारकीर्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेहवागसारखीच आक्रमक वृत्ती, पहिल्याच चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे या गुणांमुळे कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा त्याच्या उत्तम फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. उथप्पाकडे फलंदाजीचे चांगले तंत्र आणि टॅलेंटही होते. मात्र एक दिवस अचानक तो टीम इंडियामधून बाहेर फेकला गेला आणि त्यानंतर तो परत येऊ शकला नाही. त्याने नुकतेच एक मोठे विधान केले होते. ज्यामध्ये त्याने सांगितले की,’ वयाच्या २५ व्या वर्षी त्याच्याकडून एक अशी चूक झाली कि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दच बिघडली.’

माजी भारतीय सलामीवीर असलेल्या रॉबिन उथप्पाला असे वाटते की,’ वयाच्या २५ व्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळण्याच्या महत्वाकांक्षेमुळे त्याने फलंदाजीचे तंत्र बदलण्यात चूक केली. उथप्पा आता ३४ वर्षांचा आहे आणि त्याने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्ट सत्रादरम्यान तो म्हणाला की, ‘माझे सर्वात मोठे लक्ष्य भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणे हे होते. वयाच्या २०-२१ व्या वर्षी मी हा प्रयत्न केला असता तर मी कसोटी क्रिकेट खेळू शकलो असतो. माझ्या कारकिर्दीच्या शेवटी मला याबद्दल खेद करायचा नव्हता आणि मी नेहमीच सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.’

उथप्पाने प्रवीण आम्रे यांच्या मदतीने त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात काहीसे बदल केले, ज्यामुळे त्याचा मुळातच आक्रमक असलेला खेळ बदलला. तो म्हणाला, ‘ मी तांत्रिक दृष्ट्या उत्तम फलंदाज बनून दीर्घकाळ क्रीजवर खेळू शकण्यासाठी वयाच्या २५ व्या वर्षी प्रवीण आम्रे यांच्या देखरेखीखाली माझे फलंदाजीचे तंत्र बदलण्याचे ठरविले. या प्रक्रियेत, मी माझ्या फलंदाजीतली आक्रमकता गमावली. उथप्पाने भारताकडून ४६ एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो म्हणाला,, ‘मला वाटायचे की भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मला मला माझ्या फलंदाजीच्या तंत्रात बदल केला पाहिजे. मला वाटते की मी चुकीच्या वयात ते करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला. ‘

२००७ मध्ये खेळला गेलेला टी -२० विश्वचषक असो वा २००८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेला सीबी मालिका असो, रॉबिन उथप्पाने दोन्ही वेळेस टीम इंडियाला महत्त्वपूर्ण सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, इथून पुढे उथप्पाला त्याच्या प्रतिभेनुसार चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने ४६ एकदिवसीय सामन्यात २५.९९ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या, तर १३ टी -२० सामन्यात त्याने २४.९० च्या सरासरीने २४९ धावा फटकावल्या. आपल्या या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याने एकूण ७ अर्धशतक केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.