मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत.
पालिकेने नियमाचे उल्लंघन करत कंगनावर अन्याय केला आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तसंच ज्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केला जावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली. याशिवाय कोरोनाला रोखण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. राज्य सरकारने करोनासाठी कठोर पावलं उचलावी असे आदेश राज्य सरकारला द्यावेत, असंही रामदास आठवले यांनी निवेदनात म्हटलं आहे.
आज राज्यपाल महामहिम भगतसिंह कोशयारीजी से मुलाकात की। अभिनेत्री कंगना राणावत के कार्यलयपर मुंबई मनपा ने की हुई कारवाई कंगनापर अन्याय है उसे मुआवजा मिलना चाहीये और गलत कारवाई करनेवाले दोषी मनपा आधीकारियोपर कारवाई होनी चाहीये इस बारे मे चर्चा की!@BSKoshyari pic.twitter.com/wtrO7l7oRf
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 11, 2020
दरम्यान, शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील वाद अत्यंत टोकाला गेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कंगना राणौतची भेट घेतली होती. या भेटीत तुम्ही कंगना राणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न आठवले यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय, मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात यायचे असल्यास आरपीआय किंवा भाजपमध्ये तुझे स्वागत आहे, हेदेखील मी तिला सांगितले. मात्र, तुर्तास आपला राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नाही. मला सध्या चित्रपटसृष्टीतच काम करायचे आहे, असे कंगना राणौत हिने सांगितले.
त्यामुळे कंगना ताबडतोब राजकारणात प्रवेश करण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र, ती भविष्यात राजकारणात आल्यास आम्ही तिचे स्वागत करू. तिने आरपीआय पक्षात प्रवेश केला तर मला १०० टक्के आनंद होईल, भाजपमध्ये प्रवेश केला तर ५० टक्के आनंद होईल. आरपीआयमध्ये तिला लगेच खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही. तिला चळवळीत काम करावे लागले. पण भाजपमधून तिला नक्कीच खासदारकीची संधी मिळू शकते, असे आठवले यांनी सांगितले.
तसेच आपल्या मध्यस्थीमुळेच शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील तणाव निवळल्याचा दावाही आठवले यांनी केला. कंगनाने मुंबईबाबत केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि मुख्यंमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखाशी मी सहमत नाही. मात्र, तिने भावनेच्या भरात हे वक्तव्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवता आली असती. मात्र, आता शिवसेनेने हा विषय मिटवला आहे. मी मध्ये पडल्यामुळे शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झाला. यानंतर मी कंगना राणौतलाही तू आता काही बोलू नकोस, असा सल्ला दिल्याचे आठवले यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.