हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या भाजपातील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या या आरोपावर रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांच्याकडे भाजपातील नेत्यांची यादी असल्यास त्यांनी त्वरीत ती ईडीकडे द्यावी, असे आवाहन आठवले यांनी दिले आहे.
भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत नसल्याचे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी यावेळी दिले. कामोठे येथे आरपीआयचा कोकण विभागाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, दलितांवर अन्याय होत असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले.
वर्षा राऊत यांना नोटीस का?
पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’