‘मी फडणवीसांवर नाराज असलो तरी…’; ‘पवार’ भेटीनंतर जानकरांची खदखद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती । राज्यातील महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. ‘माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार,’ असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Mahadev jankar on Devendra Fadnavis and Gopichand Padalkar and Sharad Pawar)

महादेव जानकर यांनी 3 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. पण गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात ही भेट होती, असं जानकरांनी स्पष्ट केलं आहे. भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या NDAमध्येच आहोत आणि पुढेही NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर यांनी सांगितलं. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असंही जानकर म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचं जानकरांनी सांगितलं. माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण NDAमध्येच राहणार असल्याचं जानकर म्हणाले. धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्यानं जानकर नाराज आहेत. पण माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात जानकरांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला हाणला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’