Wednesday, February 1, 2023

‘.. तर त्या फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं’; शिवसेनेचा घणाघात

- Advertisement -

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि गोपिचंद पडळकर अशा भाजप नेत्यांनावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे. काल विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून आणि राज्यात आणीबाणी लागू करा अशा भाजपच्या मागणीवरुन शिवसेनेने विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. विशेष करून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळासमोर ढोल वाजवत आंदोलन केलं. या आंदोलनाचा शिवसेनेनेने चांगलाच संचार घेतला.

‘विधिमंडळांचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवीत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते, पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका आहेच.’ (saamana editorial shivsena criticized on Gopichand Padalkar and bjp)

- Advertisement -

कोणत्याही मुद्द्यावर भाजप आणीबाणीची भाषा करतं. पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर बोट करणारे आणि आपल्या राज्याविषयी चुकीचं बोलणारे भाजपला चालणार असतील तर त्यांची खणा-नारळाने ओटी भरावी अशी घणाघाती टीकाही सामनातून करण्यात आली आहे. ‘बऱ्याच दिवसांनंतर फडणवीसांचा सूर लागला पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचे शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसे घडले. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी आहे. तसेच वातावरण तयार झाल्याचा सूर फडणवीस यांनी आळवला आहे. आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असे पालुपद त्यांनी चालवले आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगातच टाकले जात आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जात आहे, अशी ‘थाप’ मारून त्यांनी सूर पकडण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्राइतके मोकळे वातावरण जगात कुठेच नसेल. स्वतः श्री. फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार यांच्यासारखे प्रमुख पुढारी रोज सरकारच्या विरोधात ‘डीजे’ लावल्याप्रमाणे ठणाणा करीत आहेत.’ असं म्हणत शिवसेनेकडून फडणवीसांसह इतर नेत्यांवरही टीका करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’