हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते सदाभाऊ खोत यांच्यावर सोलापूरमधील एका हॉटेल मालकाने २०१४ पासून बिल थकवल्याचा आरोप केला. तसेच सांगोला दौऱ्यावर असणाऱ्या सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवत याबाबत जाब विचारला. याबाबत सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लबोलही केला आहे. माझ्याविरोधात राष्ट्र्वादीनेच कटकारस्थान रचले आहे. खार तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती एका लुटारू सरदाराची टोळी आहे, अशी घणाघाती टीका सदाभाऊंनी केली.
सदाभाऊ खोत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर निवडणुकीत हॉटेलचे बिल थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. माझ्यावर आरोप करणारा संबंधित व्यक्ती हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर त्याने आरोप केले. मी वेळ पडली तर चटणी भाकर खाऊन जगणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कशाला हॉटेलमध्ये जाईन. पण मी आणि गोपीचंद पडळकर आम्ही सरकारविरोधात बोलत असल्यामुळे आमच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कारस्थाने रचण्यात आली.
माझ्याविरोधात जी बिल, कागदपत्र हॉटेलमालकाने सादर केली ती नऊ वर्षे एवढी कशी काय चकाचक राहिली. मतदान संपल्यावर हा माझ्या लोकांना कसे जेवू घालत होता? असा सवाल करत माझ्यावरती खुनी हल्ला करण्याचा हा राष्ट्रवादीचाच डाव होता. मात्र, आज राष्ट्रवादीच पितळ उघड पडलेलंआहे, अशी टीकाही सदाभाऊंनी केली.