शरद पवारांच्या 7/12 वर चौंडी आहे काय?, नातू काय औरंगजेब आहेत का?; सदाभाऊंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व नातू रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. “शरद पवार यांच्या 7/12 वर चौंडी आहे काय? आणि त्यांचा नातू रोहित पवार औरंगजेब आहे काय? म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जाण्यापासून रोखले जात आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

पोलिसांनी ताफा रोखल्यानंतर आक्रमक झालेल्या खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र अशा ठिकाणी दर्शन घ्यायला प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी प्रत्येकाला जाऊ दिले पाहिजे होते. मात्र, पवारांनी पोलीस प्रशासनाचा वापर करून रोखले आहे.

पवार घराण्याच्या 7/ 12 वरती चौंडी नाही. आणि त्यांच्या बापाचीही ती जहागिरी नाही. म्हणून या जहागीरदारांना हि महाराष्ट्रातील जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. यांची सभा झाल्यानंतर आम्हाला दर्शन घ्यायला जाऊ द्यायचे म्हणजे तुम्ही कोण औरंगजेबाची औलाद आहे काय? या देशात हुकूमशाही नाही तर लोकशाही आहे, हे पवार घराण्याने ध्यानात ठेवावे, असा इशारा यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला.

Leave a Comment