हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून आता राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री 10 वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. त्यानंतर काही वेळानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा राष्ट्रवादीने बंद पाडलेला शो पुन्हा सुरु केला. तसेच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राष्ट्रवडीवर निशाणा साधला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी ‘राष्ट्रवादीच्या डोक्यातुन “जात “अजिबात जात नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीवर केली आहे. मुंबईत तसेच ठाण्यात घडलेल्या घटनेवरून राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विवीयाना मॉलमध्ये आंदोलन करण्यात आले. यामुळे सिनेमागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
राष्ट्रवादीच्या डोक्यातुन "जात "अजिबात जात नाही !!
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 8, 2022
छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी त्यांनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांचा उल्लेख केला होता.
संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटास विरोध केला होता. अशा गोष्टींना आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे यांच्या रुपाने एक आवाज मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यापाठोपाठ त्यांनी सोमवारी रात्री ‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात आंदोलन केले.