सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत बहुजन वंचित आघाडीकडून लढणाऱ्या पडळकरांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेते त्यांची नाराजी दूर करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक लागली असल्याने राजकीय पक्षांमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीमुळे सांगली जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या जिल्ह्यात भाजपचे एक खासदार आणि दोन आमदार आहेत. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी सांगलीचे गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रविण दटके आणि अजित गोपछडे यांना संधी दिली आहे. विधानपरिषदेमध्ये पडळकरांच्या रुपाने सांगलीला संधी मिळाली. निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना संधी मिळेल, असा विश्वास होता. जिल्ह्यातील काही मंडळींनी वरिष्टांकडे त्याबाबत मागणी केली होती.
जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे, मात्र त्यांचा कालावधी एक वर्षाचा आहे. त्यामुळे देशमुख यांनाच संधी मिळेल, अशी चर्चा होती. याशिवाय जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ नेते व वरिष्टांच्या मर्जीतील प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांचेही नाव पुढे आले होते. देशपांडे यांनी त्यासाठी प्रयत्न केला नसला तरी संधी मिळाली स्वीकारणार होते. महावितरणमध्ये संचालिका असलेल्या नीता केळकर या ही विधानपरिषदेसाठी इच्छुक होत्या. मात्र तिघांचाही पत्ता कट झाला.