सांगली | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेरच्या क्षणी फसल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत मंगळवारी निश्चित झाली. महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेलचे 21 तर भाजपच्यावतीने शेतकरी विकास पॅनेलचे 16 उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीत आघाडीने मातब्बरांना उमेदवारी देत भाजपला आव्हान दिले, मात्र भाजपकडून कमकुवत उमेदवार देण्यात आले. त्यामुळे अवघ्या चार जागांसाठी चुरस होण्याची शक्यता आहे.
विकास संस्थामधून महाविकास आघाडीचे शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक, खानापूरमधून अनिल बाबर तर पलूस सोसायटी गटातून महेंद्र लाड हे तिघे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे उर्वरित 18 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा बँकेत दबदबा असलेले खासदार संजयकाका पाटील यांनी अनपेक्षितपणे माघार घेत धक्का दिला. आटपाडीत राजेंद्रअण्णा देशमुख विरुद्ध तानाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेच्या 18 जागांसाठी 21 नोव्हेंबरला मतदान होत आहे. निवडणुकीसाठी विद्यमान संचालकासह खासदार, आमदारासह माजी मंत्री, माजी आमदार आदी दिग्गजांनी अर्ज दाखल केले होते. बँकेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणूक नेत्यांसाठी डोकेदुखी वाढली होती.
उमेदवारी अर्जाच्या माघारीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे अनेक राजकीय खलबत्ते घडले. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. शेवटी भाजपने त्यांचे शेतकरी विकास पॅनेल तर आघाडीने सहकार विकास पॅनेल जाहीर केले.
सोसायटी गटात दहापैकी केवळ सहा जागांवर भाजपला उमेदवार मिळाल्याने त्यांनी 16 जागांवर पॅनेल जाहीर केल्याने याठिकाणी दुरंगी लढत होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत राजकीय हालचाली गतिमान झाल्या. जयंत पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, नेते यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. भाजप यापूर्वी सत्ताधारी पॅनेलचा भाग होती.
प्रथमच विरोधक म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 7, शिवसेनेला 3 व राष्ट्रवादीकडे 11 जागा ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. त्यानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले. निवडणुकीत आघाडीने मातब्बरांना उमेदवारी देत भाजपला आव्हान दिले, मात्र भाजपकडून कमकुवत उमेदवार देण्यात आले. त्यामुळे अवघ्या चार जागांसाठी चुरस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीच्या सोसायटी गटातील तीन जागा बिनविरोध निवडून आल्या. शिराळ्यातून राष्ट्रवादीचे आ. मानसिंगराव नाईक, खानापुरातून शिवसेनेचे आ. अनिल बाबर तर पलूसमधून काँग्रेसचे महेंद्र लाड निवडून आले. तिन्ही घटक पक्षांची प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 18 जागांसाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी अचानक सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मंगळवारी दिवसभर त्यांच्या माघारीची चर्चा सुरु होती. परंतू कवठेमहांकाळ सोसायटी गटाची जागा ऐनवेळी राष्ट्रवादीने शिवसेनेला दिल्याने या गटातून खासदार पाटील यांचे उभारण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला. याठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे.