Big Breaking | संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं होत. विरोधी पक्ष भाजप कडून सातत्याने दबाव वाढल्यानंतर अखेर मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला. संजय राठोड यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. पूजा चव्हाण प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं राठोड हे पत्नीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? अशी शक्यताही वर्तवली जात होती.

संजय राठोड यांचे पूजाला 45 फोन?

यापूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले आहेत. पूजा चव्हाणने आत्महत्या केली. त्या दिवशी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या 101 या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला.

कोण आहेत संजय राठोड

संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला ‘संत गाडगे बाबा विमानतळ’ हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

You might also like