एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान

Sanjay Raut Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. “कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? त्यांना भाई म्हटलं जातं. भाईगिरी दाखवावी ना. मग कसले भाई तुम्ही? भाई काय, तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या, असे थेट आव्हान राऊत यांनी शिंदे यांना दिले. तसेच एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर राहण्याची लायकी नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

दिल्लीत आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनापूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं, जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. शिंदे असतील किंवा फडणवीस, कारभार कुणाच्याही नावाने चालू द्या. सरकारला एकही दिवस सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायला हवे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला दिल्लीला जातायत. पण काय उपयोग आहे? महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं. अशी वेळ महाराष्ट्रावर कधी आली नाही. इतके हतबल मुख्यमंत्री, इतकं लाचार सरकार महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षांत पाहिलेलं नाही.

1 मिनीटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

या सरकारला एक मिनीटही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आज हा प्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं महाराष्ट्रातलं सरकार गेलं खड्ड्यात, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

कर्नाटकच्या हल्ल्यानंतर दोन मंत्र्यांनी शेपूट घातलं

कर्नाटक राज्यात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. काल कर्नाटकमध्ये जेव्हा हल्ला झाल्याची घटना घडली तेव्हा दोन मंत्र्यांनी शेपूट घातलं. ते बेळगावमध्ये जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार”, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.