विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा ; सामनातून विरोधकांना खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचाआक्रोश पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उद्रेकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुतेही सहभागी होऊन ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. “विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”, अशा शब्दात भाजप नेत्यांवर टीका करण्यात आली आहे.

नक्की काय म्हणल आहे सामना अग्रलेखात –

एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे, असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. पेट्रोल , डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत , पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय ? विरोधी पक्षहो , आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय ?

अशाने सरकार पाडले जाईल या भ्रमात कोणी असेल तर त्यांनी डोळ्यांवर थंड पाणी मारून जागे व्हावे हेच बरे. आपले सरकार तीन महिन्यांत येईलच येईल, असे भाजप पुढारी जागेपणी बडबडू लागले आहेत. ते अशी तरुणांची माथी भडकवून शक्य होणार आहे काय? महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे व त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच चिंता व्यक्त केली. हे संकट असेच वाढत राहिले तर नाइलाजाने कडक ‘लॉक डाऊन’ लादावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामागची भावना विरोधी पक्ष समजून घेणार नसेल तर त्यांचे राजकारण मानवतेचे उरले नसून त्यांच्या राजकारणात वैफल्यातून निर्माण झालेली अमानुषता स्पष्ट दिसू लागली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता 21 मार्चला होईल. सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले असले तरी याप्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे आंबट झाली आहेत. ‘एमपीएससी’ परीक्षा 14 मार्चला होणार होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करीत होते, पण तेलात भेसळ असल्याने आंदोलन पेटण्याआधीच विझले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment