हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉडिंग प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकत गुन्हा दाखल केला आहे. परब यांच्यावरील कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. “केंद्र सरकारकडून व भाजपकडून सूडाच्या भावनेने ईडीच्या साह्याने कारवाया केल्या जात आहेत. मात्र एक गोष्ट याद राखा कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. अशा कारवायांमुळे भाजपा रोज खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या ५५ वर्षात कधी मिळाले नाही,” अशी टीका राऊतांनी केली आहे.
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, परब हे आमचे सहकारी, कॅबिनेट मंत्री आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजकीय सूडबुद्धीने अशा प्रकारच्या कारवाया सुरु आहेत. ज्या प्रकारचे आरोप परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहेत त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपाच्या लोकांवर आहेत. पण त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सर्वजण पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
Enforcement Directorate conducts raids at seven locations in Pune and Mumbai of Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab
— ANI (@ANI) May 26, 2022
भाजपच्या लोकांना वाटले असेल कि अशा प्रकारच्या कारवाया करून मनोबल कमी करू मात्र, आमच्याकडेही भाजपाच्या असंख्य लोकांविरोधात सबळ पुरावे आहेत. नवलानीला कोणी पळवले? याचे उत्तर सबळ पुरावे आहेत म्हणणाऱ्यांनी द्यावे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील कारवाया फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी आहेत. फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा, बदनाम करायचं, महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याची टीकाही यावेळी राऊत यांनी केली आहे.