हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचले. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “शिंदे गटाचे खासदार पळकुटे आहेत. ते महाराष्ट्राचा अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाबाबत काहीच बोलत नाहीत. कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मौन का? वास्तविक शिंदे गटाने ढाल ऐवजी कुलूप चिन्ह घ्यावे कारण त्याचाही चावी दिल्लीत आहे,” अशी टीका राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेला नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत कुठे आहेत, हा प्रश्न आहे. कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेला नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटले आहेत. मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत.
‘कालही महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. मात्र, शिंदे गटाचे पळपुटे खासदार संसदेत गप्प का?, मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घ्यावी अशी अपेक्षा. पळकुटे खासदार गप्प राहिलेत, अमित शाह काय मध्यस्ती करणार?, हे त्यांनी स्पष्ट सांगावं. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली असे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी काय भूमिका घेतली आणि ते शाह काय मध्यस्ती करणार आहेत, ते त्यांनी सांगितले पाहिजे. मध्यस्ती करणार म्हणजे नक्की काय करणार, असे काही सांगितलेले नाही, असे राऊत यांनी म्हंटले.
चंद्रकांत पाटील अकलेचे कांदे
यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. भाजपकडून राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान राज्यपाल सारख्या पदावरील व्यक्तीकडून करण्यात येत आहे. तरीही भाजप गप्प आहे. महाराष्ट्र विरोधी ते आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. चंद्रकांत पाटील अकलेचे कांदे आहेत, असे राऊत यांनी म्हंटले.