हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक व महाराष्ट्र सीमावाद प्रश्न सध्या पुन्हा पेटला आहे. तो सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या सर्वपक्षीय समितीची एक बैठक घेतली. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितला. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आलेलं आहे, त्यामुळे देशातील अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटतं आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो. हे सरकार लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात असलेलं सरकार हे अत्यंत कमजोर, हतबल सरकार आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद निर्माण होत आहे. या सरकारमधील लोकांना महाराष्ट्र माहीत नाही. त्यांना अजूनही महाराष्ट्र समजलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत सीमाबांधवाच्या कोणत्या प्रश्नाला वाचा फोडली? ते त्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री आहेत. पंतप्रधान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले तेव्हा लगेच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याने जतवर दावा सांगितला. कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचेच सरकार आहे.
तीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरततडण्याचं काम
यावेळी राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वात मिंधे सरकार आहे. कुणाला मुंबई तोडायची आहे. तर कुणाला महाराष्ट्रातील गावं तोडायची आहेत. अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरततडण्याचं काम गेल्या साडेतीन महिन्यांपासून जोरात सुरू आहे. हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. गुवाहाटीवरून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवले, अशी टीका राऊत यांनी केली.
राणेंनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी
दिशा सालियानचा अपघाती मृत्यू झाल्याचा अहवाल आज सीबीआयने सादर केला. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव असल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला होता. तर नितेश राणे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. “भाजपाचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते, त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे, तर तोंडाची थुंकी का उडवत होता. एक तरुण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला,” अशी टीका संजय राऊतांनी राणेंवर केली आहे.
सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट झाल्यास…
संजय राऊत यांना पुरवली जाणारी सुरक्षा राज्य सरकारने काढून घेतल्याने यावरून राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला गर्भित इशारा दिला. ते म्हणाले की, ”मी सामना कार्यालय, शिवसेना भवनात बसलेलो असताना तसंच जेलमध्ये जाताना किंवा घरी येताना याच कारणामुळे पोलिसांची सुरक्षा दिली जात होती. काहीतरी होऊ शकतं याची माहिती असतानाही सरकारने सुरक्षा काढली आहे. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे सरकार जबाबदार असेल. आमच्यावर हल्ले व्हावेत, दवाबाखाली राहावं यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पण काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही,” असे राऊत यांनी म्हंटले.