हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. दोन महिन्यांत राज्यातील शिंदे – भाजप सरकार 100 टक्के पडणार याची माझ्याकडे पूर्ण माहिती असून मला याची खात्री देखील आहे, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.
खासदार संजय राऊत हे दिल्ली दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जितके कर्नाटकचे सरकार सीमाप्रश्नावरती अत्यंत जागरूक आहे. तितकेच महाराष्ट्राचे सरकार मला दिसत नाही. 20 लाखांचा मराठी भाषिक भाग ज्या पद्धतीने कर्नाटकात घातला गेला आहे, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिम्मत असेल तर पंतप्रधान मोदींसोबत बोलावं आणि राज्याला कळवावे.
यावेळी राऊतांनी दानवे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असे राऊतांनी म्हंटले.
रावसाहेब दानवे काय म्हणाले ?
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील एका प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी रावसाहेब दानवे यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत महत्वाचे विधान केले. ‘महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.