हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 5 राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. राजकारणात काहीच कायमचे नसते. आज तरी राष्ट्रीय नेता म्हणून मोदींना देशात पर्याय नाही, मात्र तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील आणि अहंकाराची माती होईल असे संजय राऊत यांनी म्हंटल.
उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी वाहत होते. तरीही भाजपास मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो व त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात, असं राऊत यांनी म्हटलं आहे
दरम्यान, काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावल्याचं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे. “खरी लढाई भाजपासाठी पंजाबमध्ये होती. पण तिथून भाजपानं पळ काढला आणि जेमतेम दोन जागा जिंकल्या. शीख समाजानं पंजाबच्या भूमीवर अहंकाराचा पराभव केला. पंजाबात भाजपाला गमवायचे काहीच नव्हते. पण काँग्रेसनं पंजाब कायमचे गमावले आहे”, असं राऊतांनी नमूद केलं आहे.