पवार काका- पुतण्याच्या भेटीगाठी कशासाठी? संजय राऊतांचा सर्वात मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी केल्यानंतर सुद्धा शरद पवार (Sharad Pawar)  आणि अजित पवार यांच्यात भेटीगाठी सुरूच आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शंकांना उधाण आलं आहे. अजित दादा आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी नेमक्या कशासाठी? यामागे काही राजकीय समीकरणे आहेत का? अशा चर्चा सतत सुरु असतात. या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून थेट भाष्य करत भेटीचे कारण सांगितलं आहे. पवार काका- पुतण्या यांच्यातील ही भेट राजकीय नसून संस्थाबाबत आहे असं राऊतांनी म्हंटल आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

श्री. शरद पवार यांच्या राजकारणावर महाराष्ट्र गेली 45 वर्षे चर्चा करतो आहे. पवार यांच्या संसदीय राजकारणास पन्नास वर्षांचा कालखंड होऊन गेला. इतका प्रदीर्घ काळ चर्चेत व राजकारणात असलेला दुसरा नेता आज तरी देशाच्या राजकारणात नाही. आता श्री. पवार पुनः पुन्हा चर्चेत येत आहेत ते अजित पवार यांच्याशी सुरू असलेल्या बैठकांमुळे.. अजित पवार यांनी पवारांशी राजकीय नाते तोडले. अजित पवार व त्यांचा गट भाजपच्या गोटात शिरला व त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर सुरू असलेल्या ‘ईडी’ कारवायांना ब्रेक लागला. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटण्याचे हे मुख्य कारण आहे. अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल. अजित पवार यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. आजच्या शिखरावर नेऊन बसवले. त्या शिखरावरून त्यांनी शरद पवार यांनाच ढकलण्याचा प्रयत्न केला. तरीही शरद पवार अजित पवार यांच्यात ‘संवाद’ होतो. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होणारच.

शरद पवार व अजित पवार का भेटत आहेत? माझ्या माहितीनुसार या बैठका राजकीय नाहीत; तर श्री. शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती, सहकारासंदर्भात ज्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले त्या सर्व संस्थांवर अजित पवार यांना पवारांनी आणले. हजारो शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे भविष्य या संस्थांत आहे. संस्थांचे भवितव्य काय हे ठरवण्यासाठी या बैठका असाव्यात. महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठया रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री. शरद पवार, तर संचालक म्हणून अजित पवार आहेत. असे त्रांगडे अनेक संस्थांत आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचे काम श्री. शरद पवार यांनी केले. त्या वेलूवर आज जे लटकत उभे आहेत त्यांनी त्यांची पदे सोडून स्वतःच्या नव्या संस्था निर्माण करण्याचे राजकीय औदार्य दाखवायला हवे. पण शेवटी हा पवारांच्या कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे, जेथे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच अजित पवार दावा सांगत आहेत व श्री. पवारांच्या हयातीत त्यांच्या पक्षावर स्वामित्व सांगितले गेले. तेथे संस्थांच्या हक्कांवर काय बोलायचे? असं राऊतांनी म्हंटल.

भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा वापर करून शरद पवार यांचे महाराष्ट्रातील नेतृत्वाचे युग संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. महाराष्ट्राचे एक बलदंड नेते म्हणून श्री. पवार यांचे जे स्थान आहे त्यास यामुळे धक्का बसला. नियती रोज नवे डाव खेळत असते व राजकारणाचे हे चक्र खाली-वर होत असते. देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचे वर्चस्व राहू नये यासाठी शिवसेना व शरद पवार यांना संपवायला हवे हे आजवर दिल्लीचे कारस्थान राहिले आहे. पण श्री. उद्धव ठाकरे हे नव्या उमेदीने उभेच आहेत व शरद पवार या वयातही महाराष्ट्रात रान पेटवण्याच्या जिद्दीने फिरत आहेत. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबाबतीत जे दिल्लीचे राजकारण झाले ते महाराष्ट्राला रुचलेले नाही व लोकांनी या दोन नेत्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना नव्या वादळासमोर उभे राहणे सोपे नाही.

अजित पवार हे काकांच्या जिवावर मोठे झाले व काकांचे राजकारण त्यांनी संकटात आणले व आज गोलमाल राजकारण करीत आहेत. अजित पवार यांच्याशी भेटीगाठी झाल्या तरी भाजप व मोदींबद्दल ठाम भूमिका पवारांनी घेतली हे दिसते आहे व त्याची कारणंही स्पष्ट आहेत. मोदींचे समर्थन म्हणजे प्रतिगामी शक्तीचे समर्थन व जे आज गेले आहेत त्यांचे राजकारण पुढे आपोआपच संपेल हा त्यांचा विश्वास आहे. अजित पवारांबरोबर भाजपच्या कळपात शिरण्याची चूक शरद पवार करणार नाहीत. शेवटी हा व्यक्तीचा विषय नाही. लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीचा विषय आहे असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर भाष्य केलं.