हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती केल्यांनतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर आघाडीतच वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार हे भाजपचेच आहेत असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट सल्ला दिला आहे. शरद पवारांना भाजपचे म्हणणं चुकीचं आहे, त्यामुळे त्यांनी जपून शब्द वापरावे असा सल्ला राऊतांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. प्रकाश आंबेडकर यांची ४ दिवसांपूर्वी शिवसेनेशी युती झाली आहे परंतु महाविकास आघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल त्यांनी अशी वक्तव्ये करणं आम्हाला मान्य नाही. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे उत्तुंग असे नेते आहेत. ते भाजपचे आहेत असं म्हणने हा त्यांच्यावरील मोठा आरोप आहे. मात्र ते भाजपचे असते तर २०१९ मध्ये भाजपला दूर ठेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं नसत.
शरद पवार यांनी नेहमीच भाजपला रोखण्याचे काम केलं आहे. आज सुद्धा जेव्हा आपण देशभरातील विरोधी पक्षाच्या एकीचा उल्लेख करतो तेव्हा आपण शरद पवारांचे नाव प्रामुख्याने घेतो. देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे काम शरद पवार करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेत असताना प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरावे. आपल्याला भविष्यात महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम करायचं आहे. त्यामुळे भूतकाळातील मतभेद दूर ठेवावे असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला.