हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आता थेट निवडणूक आयोगावर (Election Commission of India) निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपने बिहार निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात राज्यात सत्ता दिल्यास कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे. यात आपण काय करु शकतो? दरम्यान बिहार निवडणुकीवर आपले लक्ष असून राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाल्यास मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, तेजस्वी यादव या युवा नेत्याकडे कोणाचाही पाठिंबा नाही तसेच सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) सारख्या संस्था त्यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य तुरुंगात आहेत. तरीदेखील ते केंद्र सरकारला आव्हान देत आहेत. केंद्र सरकार विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तरिही तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’