भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत, अशा शब्दांत महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना सुनावले. तसेच आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतरत्न इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. १९७५ सालामध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले. ज्या करीम लाला बद्दल बोललं जातंय त्याच्यासह हाजी मस्तान, युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या इंदिराजींनी आवळल्या होत्या.

फडणवीसांनी राईचा पर्वत करू नये

बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष्य केले. त्यांनी म्हंटले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणा-या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.