हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केल्यांनतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. मी फडतूस नव्हे तर काडतूसं आहे, झुकेगा नही तर घुसेगा असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं. त्यांनतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला केला आहे. ED आणि CBI हीच तुमची खरं काडतूसं, म्हणूनच तुमची मस्ती आणि चरबी आहे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टाने नपुंसक म्हंटल आहे. त्यामानाने उद्धव ठाकरे यांनी फडतूस हा अतिशय सौम्य शब्द वापरला आहे. फडतूस हा मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे. डिक्शनरीत फडतूसचा अर्थ वर्थलेस. मिनिंगलेस, यूजलेस आणि बिनकामाचे लोक असा आहे. मुळात हे सरकारच बिनकामाचे असल्याने उद्धव ठाकरेंनी फडतूस शब्द वापरल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, मी फडतूस नव्हे तर काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेगा… असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिल्यांनतर त्यावरही संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तुमचं भिजलेलं काडतूस आत घुसायचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल हो… अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिली आहेत. भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात उडत नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला. तुमचं खरं काडतूस कोणतं असेल तर ते ED आणि CBI आहे. त्यामुळेच तुमची मस्ती आणि चरबी आहे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर घणाघात केला आहे.