हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवजयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केंद्र सरकारवर आणि भाजपावर निशाणा साधला. “दिल्लीने इकडचे लोक फितुर केले असून ते आमच्या मराठी बाण्यावर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत. तेव्हा दिल्लीत औरंगजेब होता, आज दुसरे कुणी दिल्लीने कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा हा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्राने उसळून म्यानातून तलवार काढून लढा दिला. त्या काळातही महाराष्ट्रातलेच काही फितुर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते. शिवरायां विरोधात कारस्थान करत होते. आजही नेमकी तीच परिस्थिती असल्याचे राऊत यांनी म्हंटले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या आहेत. त्यामध्ये खासकरून स्वाभिमान, मरण पत्करेन, पण शरण जाणार नाही हा जो बाणा शिवरायांचा आहे तो महाराष्ट्राने कायम जपण्याचे काम केले. आजही आम्ही दिल्लीसमोर ताठ कण्याने आणि बाण्याने उभे आहोत. काहीही झाले तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस दिल्लीपुढे झुकणार नाही.
आजही दिल्लीत बसलेले महाराष्ट्रातील काही फितूर महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालत आहेत. पण तरीही महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्रात सह्याद्री आहे. तो कायम हिमालयाच्या बरोबरीने लढत राहील. कुणी महाराष्ट्राला कमजोर करत असेल, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा, असेही यावेळी राऊत यांनी म्हंटले.