हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद अजूनही सुरू आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यामधली 25 वर्षांची युती तुटतयामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. दरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. “भाजपाच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे उद्धव ठाकरेंनी कधीच काढले नव्हते”, असे विधान यावेळी राऊत यांनी केले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे जोरदार पडसाद उमटत आहेत. भाजपाबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच राज्याचे भविष्य आहे, असा संदेश त्यांच्या भाषणातून मिळाला आहे. त्यामुळे भाजपाच्या बोलणी चालल्याच्या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार मुद्दे मांडले. फडनवीसांचे मत म्हणजे ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी. शिवसेनेचा जन्म 1966 सालातला. भाजपाने 1980 साली डोळे उघडले. त्यामुळे भाजपाच्या मदतीने शिवसेना उभी राहिली आणि वाढली हा दावा चुकीचा आहे. कोण कुणाच्या आधी जन्माला आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे राऊत यांनी म्हंटले.