हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी जुन्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असे विधान केले. फडणवीसांच्या याच विधानावरून आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी जाहीर केले. नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या सदरातून भाजपला टोला लगावला आहे. त्यांनी खर्गेंच्या विधानाचाही समाचार घेतला आहे. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मात्र, खरगे यांनी भाजपचा कुत्रा काढला. त्या कुत्र्यावरून संसदेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते असलेले खरगे हे गेल्या आठ दिवसांपासून तवांगमधील चीनच्या घुसखोरीवर चर्चेची मागणी करीत आहेत. त्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा नाकारली जाते. पण खरगे यांनी ‘छू’ केलेल्या कुत्र्यावर मात्र भाजपचे मंत्री संसदेत खडाजंगी करतात.
अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले. “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत.” सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय? गांधी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपिताच होते. त्यांच्या ‘राष्ट्रपिता’ पदवीस अनेक राजकीय विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. ‘या देशाला बाप नाही. असूच शकत नाही,’ असे ते म्हणत. प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या स्वातंत्र्य लढय़ातील सहभागाचा आहे. कोण सरदार व राष्ट्रपिता याचा नाही.
भाजपमधील अनेक महाभाग उघडपणे म्हणतात, ‘देशाला खरे स्वातंत्र्य 2014 नंतर म्हणजे पंतप्रधानपदी मोदी आल्यावर मिळाले. त्यामुळे 2014 नंतर एक नवा भारत निर्माण झाला आणि त्या भारताचे राष्ट्रपिता नरेंद्र मोदी आहेत!’ उद्या 2024 नंतर राज्यशकट बदलले तर नव्या भारताच्या नव्या राष्ट्रपित्याच्या पदवीचे काय करायचे? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.