औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच भाजप नेत्याकडून उल्लेख; राऊतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेबच्या उल्लेखावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले असल्याचे दिसते. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता असे विधान केले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामानातील रोखठोकमधून बावनकुळेसह भाजपवर निशाणा साधला आहे. वास्तविक औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच भाजप नेत्याकडून उल्लेख करण्यात आल्याची टीका राऊतांनी केली आहे.

संजय राऊत यांनी रोखठोकमधून औरंगजेबबाबत होत असलेल्या उल्लेखाबाबत आपले परखड मत मांडले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, औरंगजेबाचा उल्लेख बावनकुळेंनी औरंगजेबजी केला. तो उगाच केलेला नाही. त्याला काही कारणे आहेत. औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातच्या दाहोद येथे झाला. जन्मावेळी औरंगजेबाचे पिताश्री गुजरातचे सुभेदार होते.

औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी केला असावा. काँग्रेसच्या एका नेत्याने अफझल गुरुचा उल्लेख अफझल गुरुजी केला होता. तेव्हा राष्ट्रवादाच्या नावाने भाजपने धुमाकूळ घातला होता. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबला औरंगजेबजी म्हटलं त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता अशी नवी माहिती दिली. विष्णूच्या मंदिरासमोर संभाजी महाराजांना अटक केली. पण औरंगजेबाने विष्णूचे मंदिर तोडले नाही, असे औरंगजेबाचं महात्म्य सांगतानाच आव्हाड म्हणाले. या एका पुराव्याने औरंगजेब क्रूर नसल्याचे व थोर मानवतावादी असल्याचे प्रमाणपत्र आव्हाड यांनी दिले आहे.

खुद्द पंतप्रधान मोदींनी औरंगजेब क्रूर असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे औरंगजेब क्रूर नव्हता असे कसे म्हणायचे? पुन्हा बावनकुळ्यांचे सन्माननीय औरंगजेबजी प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनाही न पटणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन करणारेच औरंगजेबजी यांचा सन्मान करू शकतात, असे राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहले आहे.