हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आपल्या सर्व आमदार आणि नेत्यांसह अयोध्येत पोहोचले असून आज ते प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. बेईमानी करताना श्रीरामांची आठवण नाही झाली का? असा सवाल करत संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे. तसेच श्रीरामानेही बेईमानांच्या बाजूने कौल दिला नसता असं त्यांनी म्हंटल.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंना आम्हीच याआधी अयोध्येला घेऊन गेलो होतो. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, पण प्रभू श्रीरामाचे सत्यवचन तुम्ही कुठून घेणार? असा सवाल संजय राऊतांनी केला. तुम्हाला रामाची आठवण आत्ता झाली, जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आणि बेईमानी केली तेव्हा तुम्ही सुरत आणि गुवाहाटीला गेलात तेव्हा तुम्हाला रामाची आठवण झाली नाही. गुवाहाटीला जाण्याऐवजी तुम्ही अयोध्येला जाऊन सत्तेसाठी कौल लावला असता तर प्रभूश्रीरामांनी असत्याचा आणि बेईमानीच्या बाजूने कौल दिला नसता अस म्हणत राऊतांनी शिंदेंवर घणाघात केला.
महाराष्ट्रात मागील ७२ तासांपासून अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सगळीकडे शेतकऱ्याचा हाहाकार उडाला आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांना मदत करू असं हे म्हणाले होते, पण आता धर्माच्या नावाखाली हे सरकार पर्यटनाला गेलं आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. हे सगळं ढोंग असून प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद याना अजिबात मिळणार नाही अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.